मुंबई : कॉकरोच जनता पार्टीने स्कूल ठीक करोफ अभियान हातात घेतल्यानंतर राज्यातील शाळांची अवस्था लक्षात घेता, राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. या अभियानाची दखल घेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी मुंबईतील नंदनवन बंगल्यावर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे तसेच शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकार्यांसोबत तब्बल चार तास बैठक घेऊन झाडा झडती घेतली.
या बैठकीत त्यांनी राज्यातील शिक्षण क्षेत्राचा सविस्तर आढावा घेताना शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शिक्षण विभागाच्या विविध उपक्रमांची, योजनांची आणि आतापर्यंत झालेल्या प्रगतीची माहिती वरिष्ठ अधिकार्यांनी एकनाथ शिंदे यांना दिली. यावेळी शिक्षण मंत्रालयाकडून सुरू असलेल्या चांगल्या कामाचे कौतुक करताना एकनाथ शिंदे यांनी शिक्षण विभागाने आता मिशन मोडवर काम करून हे चांगले काम राज्यातील प्रत्येक शाळेपर्यंत आणि विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवावे, असे निर्देश दिले.
राज्यातील शाळांचे आधुनिकीकरण आणि शिक्षण व्यवस्थेत प्रत्यक्ष, दृश्यमान आणि गुणवत्तापूर्ण बदल घडवून आणण्यासाठी स्पष्ट, सर्वसमावेशक आणि कालबद्ध कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश एकनाथ शिंदेंनी दिले. आपल्या मुलांच्या आकांक्षा बदलत आहेत, त्यांची स्वप्ने बदलत आहेत. त्यानुसार आपल्या शाळाही बदलल्या पाहिजेत. महाराष्ट्रातील प्रत्येक मुलाला भविष्यातील संधी आणि आव्हानांसाठी तयार करणारी आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि भविष्यवेधी शिक्षणव्यवस्था आपण निर्माण केली पाहिजे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. या कृती आराखड्यात शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांना सोबत घेणे, शिक्षकांसाठी प्रशिक्षण, प्रोत्साहन आणि प्रेरणादायी उपक्रम राबवणे तसेच उत्कृष्ट काम करणार्या शिक्षकांना प्रोत्साहन व योग्य सन्मान देणे, यावर विशेष भर देण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या विविध शिक्षणविषयक योजनांची महाराष्ट्रात प्रभावी आणि गतिमान अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही एकनाथ शिंदे यांनी दिल्या.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास केंद्रस्थानी
शिक्षण म्हणजे केवळ अभ्यासक्रम आणि परीक्षा नसून विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि भावनिक विकास हा शिक्षणव्यवस्थेचा केंद्रबिंदू असला पाहिजे, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. त्यासाठी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, पोषण, मध्यान्ह भोजन योजनेचा आढावा तसेच विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्य आणि भावनिक स्वास्थ्यासाठी आवश्यक उपक्रम यांना अधिक महत्त्व देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
पालक आणि समाजाला शिक्षण प्रक्रियेचे भागीदार करणार
शाळांच्या विकासात पालक, माजी विद्यार्थी आणि स्थानिक समाजाची सक्रिय भागीदारी वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. शिक्षण विभागाकडून सुरू असलेले चांगले उपक्रम आणि त्यातून घडणारे सकारात्मक बदल जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचे निर्देशही एकनाथ शिंदे यांनी दिले.
आमदार-खासदारांना शाळा दत्तक घेण्याचे आवाहन
आपल्या मतदारसंघातील शाळांच्या विकासासाठी आमदार आणि खासदारांनी शाळा दत्तक घेऊन उपलब्ध निधी आणि स्थानिक संसाधनांच्या माध्यमातून योगदान द्यावे, यासाठी त्यांना आवाहन करण्यात येणार आहे.
कॉर्पोरेट क्षेत्राचे व्यावसायिक सहकार्य घेणार
शाळांच्या आधुनिकीकरणासाठी उद्योग आणि कॉर्पोरेट क्षेत्राची व्यावसायिक क्षमता वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या काळात कॉर्पोरेट क्षेत्रातील प्रतिनिधी आणि उद्योगक्षेत्रातील प्रमुखांशी बैठका घेऊन तंत्रज्ञान, प्रशिक्षण, कौशल्य, संसाधने आणि इतर आवश्यक सहकार्य मिळविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
दर आठवड्याला प्रगतीचा आढावा
कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी दर आठवड्याला प्रगतीचा आढावा घेण्यात येणार आहे. अडचणी दूर करून कामाला गती देण्यासाठी या बैठकीत आवश्यक निर्णय घेतले जातील. शाळा बदलल्या तर विद्यार्थ्यांचे भविष्य बदलेल आणि विद्यार्थ्यांचे भविष्य बदलले तर महाराष्ट्राचे भविष्य बदलेल. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक चांगला उपक्रम मिशन मोडवर पुढे नेऊन त्याचा लाभ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.